अथ ज्येष्ठागौरी पूजन
अष्टमीस ज्येष्ठादेवीपूजा सांगतो माधवीयांत-स्कंदपुराणांत "भाद्रपदमासांत शुक्लपक्षीं ज्या दिवशी ज्येष्ठा- नक्षत्रयुक्त रात्रि असेल त्या दिवशीं ज्येष्ठादेवीचें पूजन करावें.” ही अष्टमी ज्येष्ठानक्षत्रानें युक्त पूर्वा किंवा परा असेल ती घ्यावी. दोन दिवशीं ज्येष्ठानक्षत्रयोग असतां परा घ्यावी. पूर्वदिवशीं रात्रीस योग असतां पूर्वाच करावी. कारण, "नवमी- युक्त अष्टमीच करावी यांत संशय नाहीं. भाद्रपदमासांत शुक्लपक्षीं ज्या दिवशीं ज्येष्ठानक्षत्रयुक्त रात्रि असेल त्या दिवशीं ज्येष्ठादेवीचें पूजन करावें" असें तेथेंच सांगितलें आहे. याचा अपवाद- "ज्या दिवशीं मध्याह्नापुढें ज्येष्ठानक्षत्र अल्पहीं असेल त्या दिवशीं हविष्य व पूजा हीं करावीं. मध्याह्नांत न्यून असेल तर पूर्व दिवशीं करावी." हैं व्रत केवलतिथीस व केवलनक्षत्रावरही करण्याविषयीं सांगितलें आहे. त्यांत पहिलें केवल तिथीस करावें. दुसरें केवल नक्षत्रावर करावें. तें सांगतो - मत्स्यपुराणांत - "प्रतिवषर्षी करावयाचें जें ज्येष्ठादैवतव्रत तें तिथीस सांगितलें आहे. आणि प्रतिज्येष्ठानक्षत्रावर करावयाचें जें ज्येष्ठाव्रत तें केवल नक्षत्रावर सांगितलें आहे. पहिलें केवल तिथीसच करावें. आणि दुसरें केवल नक्षत्रावरच करावें." म्हणूनच मदनरत्नांत भविष्यांत नक्षत्रावर करण्याविषयीं सांगितलें आहे, तें असें- "भाद्रपदमासांत शुक्लपक्षीं ज्या दिवशीं ज्येष्ठा असेल त्या रात्रीस जागरण करून ज्येष्ठादेवीचें पुढील मंत्रानें पूजन करावें." दाक्षिणात्यलोक तर केवल नक्षत्रावरच करतात. हेमाद्रींत स्कांदांतही "भाद्रपदमासांत शुक्लपक्षीं ज्येष्ठानक्षत्र कोणत्याही दिवशीं असेल त्या दिवशीं ज्येष्ठादेवीचें पूजन करावें." तसेंच "अनुराधानक्षत्रावर ज्येष्ठादेवीचें आवाहन, ज्येष्ठानक्षत्रावर पूजन व मूलनक्षत्रावर विसर्जन करावें, असें हें त्रिदिनात्मक व्रत होय." पूजेचा मंत्र - "एह्येहि त्वं महाभागे सुरासुरनमस्कृते ॥ ज्येष्ठे त्वं सर्वदेवानां मत्समीपगता भव" यानें आवाहन करून "तामग्निवर्णा०" यानें पूजन करून "ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं श्रेष्ठायै ते नमो नमः ॥ शर्वायै ते नमस्तुभ्यं शांकर्यै ते नमो नमः ॥ ज्येष्ठे श्रेष्ठे तपोनिष्ठे * ब्रह्मिष्ठ सत्यवादिनि ॥ एह्येहि त्वं महाभागे अर्घ्य गृह्ण सरस्वति ॥” यानें अर्घ्य द्यावें.
Commenti