महाराष्ट्रातले संत नामदेव पंजाबी लोकांचे 'बाबाजी' कसे बनले? शीख धर्मावर नामदेवांचा प्रभाव कसा?
घुमानमधील गुरुद्वारा
"आम्ही तुमचे आभारी आहोत. एक महान संत तुम्ही आम्हाला दिला आहे," संतोख सिंह महाराष्ट्रातल्या लोकांचे आभार मानत होते.
आम्ही महाराष्ट्रातून आलोय म्हटल्यावर मोठ्या कौतुकानं त्यांनी मी पंढरपूर, आळंदीला जाऊन आलोय हे सांगितलं. त्यांच्यासाठी ही ठिकाणं खास होती. कारण ती त्यांच्या 'बाबाजीं'शी जोडलेली होती.
आता हे बाबाजी कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हे 'बाबाजी' म्हणजे संत नामदेव. आपल्यासाठी 'संत' असलेले नामदेव हे घुमान गावातल्या लोकांसाठी 'भगत' नामदेव किंवा 'बाबाजी' आहेत.
पंजाबमध्ये अमृतसरजवळच्या गुरुदासपूर जिल्ह्यातलं घुमान...आपल्याकडच्या एखाद्या तालुक्याच्या ठिकाणासारखं असलेलं हे गाव. शेकडो वर्षांपासून या गावाची नाळ महाराष्ट्रासोबत जोडली गेली आहे. ती जोडणारा दुवा आहे संत नामदेव. नामदेवांच्या याच पंजाब कनेक्शनचा शोध घेत आम्ही थेट घुमानला पोहोचलो.
'गुरू ग्रंथ साहिब'मध्ये काय लिहिलेलं आहे? त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे?
महाराष्ट्राच्या इतिहासातील 'साडेतीन शहाणे' कोण होते?
संत तुकारामांचा खून झाला होता की ते सदेह वैकुंठाला गेले?
पंजाबमधल्या जालंधर, बियासवरून घुमानला जावं लागतं. बियासपासून पुढे गेल्यावर आधी मॅप लावून आणि मग विचारत विचारत पुढे जात होतो. घुमानमध्ये पोहोचल्यावर बाजारपेठेतून वाट काढत आम्ही पोहोचलो 'बाबा नामदेवजीका गुरुद्वारा'मध्ये.
पांढऱ्या शुभ्र कमानीतून आत गेल्यावर गुरुद्वाऱ्याची मुख्य इमारत आहे. इमारतीच्या डाव्या बाजूला विस्तीर्ण तलाव आहे. आतमध्ये नामदेवांची दोन चित्रं पाहायला मिळतात. त्यांपैकी अंगरखा, उपरणं, डोक्याला पगडी आणि गळ्यांत वीणा घातलेलं रुप आपल्याला परिचयाचं आहे. पण पद्मासनात बसलेले, शुभ्र दाढीधारी, लांब केसांचा डोक्यावर बुचडा बांधलेला...हे नामदेवांचं पंजाबी रुप.
नामदेव पंजाबमध्ये का गेले?
पण मुळात इसवी सन 1270मध्ये महाराष्ट्रातल्या नरसी इथं जन्मलेले नामदेव थेट पंजाबपर्यंत पोहोचले कसे? तिथे त्यांचे अनुयायी कसे तयार झाले? असे प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित झाले.
संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी याबद्दल माहिती देताना म्हटलं की, "पंजाबमध्ये जाण्याआधीही एकदा नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांसोबत उत्तर भारताची यात्रा केली होती. त्याचा वृत्तांत त्यांनी स्वतःच तीर्थावळी नावाच्या प्रकरणात लिहिला आहे. त्यामुळे त्यांना उत्तरेकडची परिस्थिती माहिती होती.
ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतरही त्यांनी काही तीर्थयात्रा केल्या. ते दक्षिणेतही गेले होते. पण नंतर त्यांनी पंजाब हीच आपली कर्मभूमी निवडली."
घुमानमधील नामदेव मंदिर
"पंजाब हा सीमेवरचा प्रदेश होता. तिथे परकीय आक्रमणं होत होती. उत्तरेत खिलजी, नंतर तुघलकांचं साम्राज्य होतं. अशाप्रकारे ज्यावेळी इथल्या संस्कृतीपेक्षा एक वेगळ्या प्रकारची संस्कृती इथे येते तेव्हा आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतात- एक म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवणे आणि दुसरं म्हणजे त्यांच्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करणे. ही दोन्ही कामं तिथे राहून करता येतील असं नामदेवरायांना वाटलं असेल," असं डॉ. मोरे सांगतात.
नामदेवांच्या पदांमध्येही या काळाचे पडसाद पहायला मिळतात.
देवा पापछळे कांपते मेदिनी
दैसाचिने भारे वाटली अवनी
अधर्म प्रवर्तला माहितळी , ऐसे पापे कळी थोर आला...
अधर्म वाढला आहे, असं म्हणत नामदेवांनी देशाटन केलं, भक्तिमार्गाचा प्रसार केला. या त्यांच्या प्रवासात शेवटी ते पंजाबात स्थिरावले असं दिसतं.
घुमान- नामदेवांची कर्मभूमी
उत्तर भारतात तीर्थयात्रा करत असलेले नामदेव हे हरिद्वारहून दिल्ली तिथून पंजाबमधील भूतविंड, मर्डी, भट्टीवाल असा प्रवास करत घुमानमध्ये पोहोचले. त्यानंतर ते जवळपास वीस वर्षं इथंच राहिले.
याच ठिकाणी त्यांना बोहरदास, जल्ला, लद्धा, कंसो असे अनेक शिष्यही मिळाले.
घुमान नावाचं कोणतंही गाव आधी नव्हतं. इथं सगळं जंगलच होतं. पण नामदेव इथं आल्यानंतर लोक येऊ लागले, वर्दळ सुरू झाली आणि हे गाव वसलं, असं इथले लोक सांगत होते.
संत नामदेव
आज हे गाव गजबजलेलं आहे. टुमदार घरं, शेतं, छोटी-छोटी दुकानं, मुख्य बाजारपेठ आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेला नामदेवांचा गुरुद्वारा.
हा गुरुद्वाराही आधी नव्हता. कारण नामदेवांचा काळ हा इसवी सन 1270 ते इसवी सन 1350. तर शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू नानकदेव यांचा काळ इसवी सन 1469 ते इसवी सन 1539. म्हणजेच नामदेवांच्या काळानंतर जवळपास दोनशे वर्षांनी शीख धर्माची स्थापना झाली. त्यामुळे इथे आधीपासून गुरुद्वारा असण्याची शक्यता नव्हती. इथं एखादं मंदिर असावं असं सांगितलं जातं.
कदाचित त्यामुळे या गुरुद्वाऱ्यामध्ये हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती पहायला मिळतात. राधाकृष्णापासून ते गणपती, हनुमान, शंकराची पिंड इथे दिसते. मंदिर असलेला हा देशातला एकमेव गुरुद्वारा असावा, असं या गुरुद्वारा समितीच्या व्यवस्थापकांचं म्हणणं आहे.
मंदिराला लागून असलेल्या गुरुद्वाऱ्याच्या मुख्य सभागृहातल्या महिरपीत शीख धर्माचा आदिग्रंथ 'गुरुग्रंथसाहिब' आहे. सभागृहाच्या एका बाजूला शीख धर्मातील दहा गुरुंचे फोटो आहेत, तर दुसऱ्या बाजूला नामदेवांसह 15 संतांचे फोटो आहेत. 'गुरुग्रंथसाहिब'मध्ये शीख गुरुंसह या पंधरा संतांचीही पदं आहेत आणि सर्वाधिक 61 पदं आहेत संत नामदेवांची.
'नामदेवांची पदं आमच्या धर्मग्रंथात आहेत. त्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा गुरुग्रंथसाहिबसमोर मस्तक टेकवतो, तेव्हा तेव्हा नामदेवांसमोरही मस्तक टेकतो,' असं गुरुद्वारा व्यवस्थापक समितीचे सचिव सुखजिंदर सिंह लाली सांगतात.
शीख धर्मावर नामदेवांचा प्रभाव कसा?
नामदेव तीर्थयात्रा करत करत उत्तर भारतात गेले, पंजाबमध्ये राहिले हे ठीक आहे. पण त्यांची पदं गुरुग्रंथसाहिबमध्ये कशी समाविष्ट झाली? शीख धर्मावर त्यांचा एवढा प्रभाव कसा होता?
नामदेवांची पंजाबमध्ये प्रचलित असलेली प्रतिमा
त्याबद्दल बोलताना डॉ. सदानंद मोरे सांगतात की, "केवळ शीख धर्मावरच नाही, तर उत्तर भारतातल्या संत परंपरेवर नामदेवांचा खूप मोठा प्रभाव आहे. नामदेवांच्या आधी उत्तरेमध्ये कोणी संत म्हटली जाणारी व्यक्ती नव्हती. नामदेवांनी संतत्व ही गोष्ट तिथे रुजवली. तुलसीदास, सूरदास, नरसी मेहता हे सगळे संत नामदेवांच्यानंतरचे. त्याच प्रभावळीत गुरु नानक येतात.
म्हणूनच नामदेवांची कवनं शीख धर्मीयांनी जतन केली. ती प्रक्रिया खूप आधीपासून सुरू झाली. नानकांनी ती पुढे नेली. आणि जेव्हा शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू गोविंदसिंह यांनी महाराष्ट्रातल्या नांदेडमध्ये जेव्हा 'गुरुग्रंथसाहिब'ला जेव्हा शेवटचा आकार दिला, तेव्हा त्यात नामदेवांचीही पदं समाविष्ट केली. याचाच अर्थ ते शीख धर्मीयांना मान्य होते."
नामदेवांशी संबंधित आख्यायिका
नामदेवांचं या लोकांच्या मनातलं स्थान घुमानमध्ये फिरतानाही जाणवत होतं. केवळ घुमानच नाही, तर इथल्या आजूबाजूच्या परिसरात, गावातही संत नामदेवांच्या नावानं असलेले गुरुद्वारे आहेत.
आमच्यासोबत कुलदीप सिंह होते. ते घुमानमधल्या नामदेवजींच्या गुरुद्वाऱ्यात दहा वर्षं सेवा करतात. ते या प्रत्येक गुरुद्वाऱ्यासोबत जोडलेली आख्यायिका सांगत होते.
कुलदीप सिंह
ज्याठिकाणी नामदेव तप करायचे, तिथला गुरुद्वारा 'तपियाना साहिब' म्हणून ओळखला जातो.
नामदेवांनी जिथ विहीर खोदली तो गुरुद्वारा कुआँ साहिब.
'नामियाना साहिब' नावाचा गुरुद्वारा आहे. या गुरुद्वाऱ्यात नामदेवांची एक ध्यानस्थ मूर्ती आहे. या गुरुद्वाऱ्याचं व्यवस्थापन एक मराठी व्यक्ती सांभाळत होती. त्यांचं नाव नारायणदास गायकवाड.
'महाराष्ट्रातून 1971-72च्या सुमारास ते आले होते. जवळपास पन्नास वर्षं ते इथं राहिले होते. उन्होंने पिछे मुडके नहीं देखा,' असं इथले लोक सांगत होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांचं निधन झालं.
नामियानासाहिब गुरुद्वाऱ्यामधील सेवेकरी
धारिवाल नावाच्या गावाला जाताना गुरुद्वारा 'खुंडी साहिब'ही आहे. खुंडी म्हणजे काठी. नामदेवांना काही लोकांनी म्हटलं की, संत आहात तर काही चमत्कार करून दाखवा. नामदेवांनी एक काठी जमिनीत रोवली आणि त्याला पालवी फुटली. आजही हा वृक्ष हिरवागार आहे, असं इथले लोक मानतात.
कुलदीप सिंह यांनी आम्हाला या गुरुद्वाऱ्यातलं डेरेदार झाडं दाखवलं. हेच ते नामदेवांनी हिरवं केलेलं झाड असं ते सांगत होते.
या आणि अशा अनेक कथा या भागात प्रचलित आहेत. यातला चमत्काराचा भाग सोडला, तरी या लोकांची नामदेवांबद्दलची आस्था पदोपदी जाणवते. नामदेवांच्या गोष्टी या लोकांच्या जगण्याचा भाग बनल्या आहेत.
नामदेवांची समाधी घुमानमध्ये की पंढरपूरमध्ये?
घुमानमधल्या लोकांची अशीच एक मान्यता म्हणजे संत नामदेवांनी घुमानमध्येच समाधी घेतली.
घुमानच्या गुरुद्वाऱ्यामध्ये एक घुमटी आहे. ही नामदेवांची समाधी असल्याचं गुरुद्वाऱ्याचे विश्वस्त सांगतात. नामदेवांचे इथे बोहरदास नावाचे शिष्य होते. (त्यांचे वंशज आजही या गावात आहेत. यांची नावं 'बावा' गुरुद्वाऱ्याच्या विश्वस्त समितीत बहुतांश हेच लोक आहेत.) त्यांनी ही समाधी बांधली असल्याचं ते सांगतात.
या समाधीवरचा घुमट हा इस्लामिक स्थापत्यशैलीत बांधला आहे. नामदेवांसाठी हा घुमट फिरोझशाह तुघलकाने बांधून दिला, असंही या लोकांचं म्हणणं आहे.
नामदेवांच्या घुमानमधील मंदिराचा उल्लेख हा लेखक भाई साहब कानसिंह नाथा यांच्याही कोशात आहे. इसवी सन 1770 मध्ये सरदार जस्सासिंह रामगढिया यांनी हे मंदिर बांधले. तर काही इतिहासकार मोहम्मद तुघलकानं नामदेवांना दिलेल्या त्रासाचं प्रायश्चित्त म्हणून फिरोझशाह तुघलकानेच हे समाधीमंदिर बांधल्याच्या मताचे आहेत.
संत नामदेवांनी पंढरपूरमध्ये समाधी घेतली, असं महाराष्ट्रात मानलं जातं. रा. चिं. ढेरेंसारख्या अभ्यासकांनीही नामदेवांचा अखेरचा काळ हा पंढरपूरमध्ये गेल्याचं म्हटलं आहे.
सुखजिंदरसिंह लाली याबद्दल सांगतात की, नामदेव जेव्हा इथे आले, तेव्हा काही फार तरुण नव्हते. ते जवळपास वीस-पंचवीस वर्षं इथे राहिले. त्यामुळे इतकं वय झाल्यावर प्रवास करत पंजाबमधून महाराष्ट्रात जाणं खरंच शक्य होतं का? त्यामुळे त्यांची समाधी इथेच आहे, असं आम्हाला वाटतं.
अर्थात, यात काही वादाचा विषय नाहीये. ते संत होते. त्यांचं अस्तित्त्व सर्वव्यापी होतं. त्यामुळे पंढरपूरलाही ते आहेत आणि इथंही, असंही लाली पुढं म्हणतात.
हा श्रद्धेचाही भाग आहे, पण इथल्या लोकांनी नामदेवांना आपलं मानल्याच्या खुणा इथल्या नामदेव भवन, नामदेव कॉन्व्हेंट स्कूलसारख्या वास्तूंमधूनही दिसतात. पुण्यातल्या 'सरहद' संस्थेनं इथं 2015 साली साहित्य संमेलनही आयोजित केलं होतं. त्यानंतर इथं नामदेवांच्या नावानं विद्यापीठही उभं राहिलं आहे
'आम्हीही पंढरपूर, नरसीला जाऊन आलोय'
आम्ही महाराष्ट्रातून आलोय हे कळल्यावर उत्सुकतेनं गप्पा मारणारे लोकही भेटत होते. सतनाम सिंह हे त्यांपैकीच एक. मी नुकताच नामदेवांच्या जन्मगावी नरसीला जाऊन आलो, असं सांगत त्यांनी तिथले 'बाबाजी की कुटिया' म्हणजे नामदेवांच्या घरातले फोटोही दाखवले.
आम्ही गेलो तेव्हा गुरुद्वाऱ्यामध्ये आजींचा एक घोळका आला होता. आम्ही पंढरपूर, पुणे, आळंदीला जाऊन आलोय असं सांगत होत्या. "आप लोगोने हमें सब दिखाया. बाबाजीने सब दिखाया." असं सांगत होत्या.
ढोलक, मंजिऱ्या वाजवत 'जय हो बाबा नामदेवजी' असं म्हणत पंजाबीमध्ये त्यांचं कीर्तन सुरु होतं. महाराष्ट्रातल्या एका संताला या बायका पंजाबीतून ज्यापद्धतीने आळवत होत्या, ते पाहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली...भाषा, प्रांत, धर्माच्या पलिकडे जात पंढरपूर आणि पंजाब, सत् श्री अकाल आणि जय हरी विठ्ठलला जोडणारा नामदेव नावाचा हा दुवा किती बळकट आहे.
कारण आज शेकडो वर्षांनंतरही मराठी माणूस ज्या श्रद्धेने नामदेवांचे अभंग गातो, त्याच आस्थेने पंजाबी माणूस नामदेवांची 'बाणी'
Comments