उजव्या सोंडेच्या गणपतीविषयी कोणते शास्त्रसंकेत आहेत ?
गणपतीच्या सोंडेचे अग्र त्याच्या उजव्या वरील हाताकडे वळले असल्यास तो सिद्धिविनायक, व डाव्या वरील हाताकडे वळले असल्यास तो ऋद्धिविनायक समजला जातो. त्याचप्रमाणे सोंडेचे टोक त्याच्या उजव्या खालील हाताकडे वळले असल्यास बुद्धिविनायक व डाव्या खालील हाताकडे वळले असल्यास तो शक्तिविनायक समजला जातो. चार विनायकांपैकी सिद्धिविनायक हा सर्वप्रसिद्ध असून तो मोक्षसिद्धि- कारक समजला जातो. उजव्या सोंडेच्या गणपतीविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथांत सूक्ष्म तपशिलासह फारसा ऊहापोह केलेला आढळत नाही. गणेशाच्या निरनिराळ्या ध्यानांमध्येही तसा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. त्यामुळे काही वृद्ध, जाणकार व निस्सीम गणेशभक्तांनी दिलेल्या माहितीवर अवलंबून राहावे लागते. ज्या गणेशपंथी साधकांनी गणेश देवतेचा अतिसूक्ष्म विचार केलेला आहे त्यांच्या मते गणेश व महागणपती ह्या दोन भिन्न संकल्पना असून पार्वतीने तयार केलेला गणेश हा महागणपतीचा अवतार होय. तिने मृत्तिकेचा आकार करून त्यात महागणपतीचे आवाहन केले. हा महागणपती म्हणजेच जगदुत्पत्ती होण्यापूर्वी निर्गुण व कूटस्थ स्वरूपात असलेले महत्तत्त्व होय. ह्या महागणपतीनेच विविध प्रसंगी विविध प्रकारचे अवतार घेऊन दुष्टांचा संहार व सुष्टांचा प्रतिपाळ केला. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी लेण्याद्रीचा गिरिजात्मक हा गणेशावतार (पार्वतीपुत्र) व इतर सात महागणपती होत असे सांगितले जाते. जेव्हा विशिष्ट सिद्धी किंवा मोक्षसिद्धीच्या प्राप्तीस्तव गणपतीची आराधना केली जाते तेव्हा उजवीकडे सोंड असलेला गणपती घेण्याची प्रथा आहे. अशा वेळी शक्यतो पार्थिव गणपतीची आराधना करणे अपेक्षित असते. ह्या पार्थिव गणेशाच्या आराधनेत स्वहस्ते मृत्तिकेपासून तयार केलेल्या सिद्धिविनायकाची ध्यानावाहनपूर्वक षोडशोपचार पूजा व त्याचे लगेचच विसर्जन विहित असते. ही पूजा अत्यंत शुचिर्भूतपणे व तंतोतंत विधिविधानपूर्वक करणे आवश्यक असते. ह्यास्तव तज्ज्ञ गणेशोपासकाकडून ह्याचे विधिविधान जाणून घ्यावे.
उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेमागील कामना उच्चस्तरीय असल्यामुळे कडक सोवळे, घरात अत्यंत पवित्र वातावरण व सात्त्विक आहार, दररोज मोदकनैवेद्य इत्यादी गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात. ह्यास्तव उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची आराधना अत्यंत मर्यादित स्वरूपात आढळते. ह्या आराधनेस विकल्प म्हणून गणेशचतुर्थीनिमित्त गणपतिपूजन केले जाते. ह्या वेळी त्याची सोंड डावीकडे असली तरी तो सिद्धिविनायक म्हणूनच पुजला जातो. क्वचित प्रसंगी सोने, चांदी, तांबे, पितळ इत्यादी धातूंपासून तयार केलेल्या उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाच्या मूर्ती आढळतात. पण पूर्वापार चालत आलेल्या अशा मूर्तीच्या आराधनेमागे असलेली भक्ती ही बऱ्याच वेळा प्रीतिपोटी नसून भीतीपोटी असल्यामुळे त्यातून अपसमज प्रचलित होतात. उदाहरणार्थ कडक आचार न पाळल्यास उजव्या सोंडेचा गणपती सर्वनाश करतो, सिद्धिविनायक घरामध्ये ठेवू नये; अशा एक ना अनेक अंधश्रद्धा त्यातूनच प्रसृत होतात. वास्तविक कडक आचार न पाळल्यास फार तर देवमूर्तीतील देवत्व कमी होईल, पण त्याचे तथाकथित अतिरंजित परिणाम होणार नाहीत. कारण त्यास तसा शास्त्राधार नाही. ज्या घरात उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती आहे तेथे काही उपद्रव असतीलच, तर त्यामागे तशीच निरनिराळी कारणे असतील. त्यासाठी गणपतीला जबाबदार धरण्यात काहीच अर्थ नसतो.
उजवी सोंड 'अनिष्ट' नाही.
सामान्यतः गणपतीची सोंड डावीकडे वळलेली असते. पण उजवीकडे वळलेली असेल तर त्याला उजव्या सोंडेचा गणपति म्हणतात. असा गणपति फार कडक असतो व अशी मूर्ति घरात ठेवली तर काही तरी अनिष्ट घडते, अशी लोकांची समजूत आहे. पण ही समजूत चुकीची आहे. सोंड कुणीकडे वळवावी हे त्यांच्या मर्जीवर आहे. कोणत्याहि बाजूस सोंड वळलेली असली तरी त्यात शुभाशुभत्व अथवा इष्टानिष्टत्व काही नाही. उजव्या सोंडेचा गणपति म्हणून घाबरण्याचे काही कारण नाही.
गणपतीची स्पंदने व चतुर्थी तिथीची स्पंदने चतुर्थी तिथीला सारखी व अनुकूल होतात म्हणून चतुर्थी ही तिथि गणपतीच्या व्रताकरता ठरली आहे. मंगळ म्हणजे अंगारक हा महान गणपति भक्त होता. म्हणून मंगळवारी चतुर्थी आली तर तिला अंगारकी असे म्हणतात. हा विशेष योग होतो.
हे इतर व्रतांप्रमाणे अहोरात्राचे व्रत नाही. ते पंचप्रहरात्मक व्रत आहे. दिवसाचे चार व रात्रीचा एक असे पाच प्रहर. चंद्रोदयाला भोजन करावे असा विधि आहे. म्हणून ते जेवण म्हणजे पारणा नसून व्रतांगभोजन आहे.
असा हा सृष्टीच्या पूर्वीपासून आलेला गणपति देव आहे. 'आविर्भूतंच सृष्ट्यादौ' असे अथर्वशीर्षातच म्हटले आहे.
...
Comments