आषाढ शुक्ल एकादशी चे दिवशी सकल उपचारांनी युक्त अशा मंचकावर, शंख चक्रादि आयुधांनी युक्त लक्ष्मी चरण चुरीत बसली आहे अशी विष्णूची प्रतिमा करून तिची नानाविध उपचारांनी पूजा करावी.
सुप्ते त्वयि जगन्नाथे जगत्सुप्तं भवेदिदम्।
विबुद्धे त्वयि बुध्येत तत्सर्वं सचराचरम्।।
याप्रमाणे प्रार्थना करावी.
त्या दिवशी उपवास करून रात्री जागरण करावे. द्वादशीच्या दिवशी पुन्हा पूजा करून दिवशी गीत नृत्य वाद्य इत्यादिकांनी सेवा करावी याप्रमाणे हे तीन दिवसांचे व्रत आहे. याविषयी स्मार्त वैष्णव यांनी आपल्या एकादशीचे दिवशी शयनी व्रताला प्रारंभ करावा. रात्री शयनोत्सव करावा. दिवसात प्रबोध उत्सव करावा. द्वादशीला पारणे चे दिवशी शयनोत्सव व प्रबोध उत्सव करावे. याविषयी जसा देशाचार असेल त्याप्रमाणे व्यवस्था जाणावी. हे व्रत मलमासामध्ये करू नये. आषाढ शुद्ध द्वादशीला अनुराधा योग नसेल तेव्हा पारणा करावी. त्यामध्येही अनुराधा नक्षत्राचा पहिला चरण मात्र वर्ज्य समजावा.
जेव्हा द्वादशी अल्प असून वर्ज नक्षत्राचा भाग द्वादशीचा अतिक्रम करून असेल तेव्हा निषेधाचा त्याग करून द्वादशीचे दिवशीच पारणा करावी असे कौस्तुभामध्ये सांगितले आहे. संगवकालाचा भाग टाकून प्रातःकाली अथवा मध्याह्न काली भोजन करावे हे असे पुरुषार्थ चिंतामणी मध्ये सांगितले आहे.
या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. त्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते. आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते. या दिवशी रोजच्या पुजेबरोबरच श्रीविष्णूची `श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. तसेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावे पूजा केली जाते.
या एकादशीस भगवान हरी क्षीर समुद्राचा उदका मध्ये शेष नयना वर निद्रा करितात. व कार्तिक शुक्ल एकादशीस जागृत होतो. यास्तव या तिथीस हरीचे पूजन केले असता ब्रह्महत्यादि पापे तत्काळ जातात. ज्याने निद्राकाली व प्रबोधकाली हरी ची पूजा केली. त्या महात्म्याचे हिंसात्मक यज्ञांनी काय करावयाचे आहे? यज्ञांपेक्षाही हे अधिक होय. या एकादशीस व द्वादशीस निद्रा महोत्सव सांगितला आहे.
एकादशी व्रत
दशमीचे दिवशी एकादशीचा योग असेल तर दशमी मध्येच भोजन करावे. एकादशीचे ठायी भोजन करू नये. काम्य एकादशी व्रत अंगत्वाने पूर्व दिवशी एकभुक्त रहावे. आठ वर्षांहून अधिक वयाचा आणि ८० वर्षांहून कमी वयाचा मनुष्याने शुक्ल व कृष्ण एकादशी चे ठायी उपोषण करावे. ब्रह्मचारी सौभाग्यवती स्त्री व गृहस्थाश्रमी यांनी शुक्ल एकादशीच नित्य करावी. पती जिवंत असताना जी स्त्री उपोषण करून व्रताचरण करिते ती भरत्याचे आयुष्य हरण करून नरकाप्रत जाते असे वचन नवऱ्याच्या आज्ञेविरहित व्रतविषयक होय.
उपवासा विषयी सामर्थ्य नसेल तर एक भक्त नक्त अयाचित उपवास आणि दान यातून कोणतेही एक करावे परंतु एकादशी व्रताचा त्याग करू नये.
एकादशी व्रत हे दशमी एकादशी द्वादशी असे तीन दिवसांचे मिळून असते. दशमी एकादशी द्वादशी या तीन दिवशी सुगंधी द्रव्य तांबूल पुष्पे स्त्री संभोग वर्ज करावी.कांस्य पात्र मांस मसुरा पुनर भोजना अति उदकपान ही दशमीचे ठाई वैष्णवा ने वर्ज्य करावी.
क्षार लवण वर्जित हविष्यान्नभोजी भूमी शा यी स्त्रीसंग विरहीत रहावे.
व्रतघ्न कृत्ये वारंवार उदकपान करणे, दिवानिद्रा, अष्टांग मैथुन याहीं करून उपोषणाचा नाश होतो.
शरीरास अभ्यंग मस्त कास अभ्यंग तांबूल गंधाची आणि अन्य ठिकाणी निषिद्ध कर्मे सांगितली आहेत ती व्रतस्थाने सर्व वर्ज्य करावी. पापे अन्न आश्रित आहेत ती अन्नदाता भोक्ता या उभयतांस प्राप्त होतात आणि त्यांचे पितर नरकात वास करितात.
सर्व भूतान पासून भय, व्याधी प्रमाद गुरुची आज्ञा यातून व्रत नाशक एखादी गोष्ट एक वार झाली असता व्रत नष्ट होत नाही. उदक, मुळे, फळे, दूध, हवि, ब्राम्हण-कामना गुरुवचन औषध हि आठ व्रतघ्न होत नाहीत.
एकादशी व्रताचा संकल्प
उदकपूर्ण ताम्रपात्र हातात घेऊन उत्तराभिमुख होत असता उपवासाचा संकल्प करून उपवास ग्रहण करावा अथवा हातात उदक धारण करावे.
एकादश्यां निराहारः स्थित्वाहम परेहनि।
भोक्ष्यामि पुण्डरीकाक्ष शरणं मे भवाच्चुत ।।
शिवादि गायत्री मंत्राने अथवा नाम मंत्राने संकल्प करावा. याप्रमाणे संकल्प मंत्र म्हणून विष्णूला पुष्पांजली समर्पण करावी. नंतर ते पात्रस्थ उदक अष्टाक्षर मंत्राने तीन वेळ अभिमंत्रित करून प्राशन करावे.
द्वादशीच्या दिवशी प्रातःकाली भगवंताला व्रत समर्पण करण्याचा मंत्र:
अज्ञान तिमिरान्धस्य व्रतेनानेन केशव।
प्रसीद सुमुखो नाथ ज्ञानदृष्टि प्रदो भव।।
यथाशक्ति ब्राह्मणांस भोजन घालून
नंतर दक्षिणा द्यावी. एकादशीचे दिवशी उपवास करून द्वादशीचे दिवशी जो मनुष्य विष्णू नैवेद्य तुलसी मिश्रित भक्षण करील त्याच्या कोटी हात्यांचा नाश होईल असे स्कंदपुराण सांगते. दिवा निद्रा, परान्न भोजन, पुनर्भोजन, मैथुन, मध, कांस्य पात्र भोजन, आमिष, तैल हे आठ प्रकार द्वादशीचे दिवशी वर्ज करावे. पुनर्भोजन, स्वाध्याय, भार वाहणे, आयास, मैथुन व पांचवी दिवानिद्रा हीं उपवास फलाचा नाश करितात.
परान्न भोजन, कांस्यपात्रभोजन, तांबूल, लोभ, व्यर्थ भाषण, ही वर्ज्य करावी.
असंभाष्य (चांडाळा) शी संभाषण केले असता तुलसीपत्र व आवळा पारणा भोजनात भक्षण केल्याने शुद्ध होतो.
रजस्वला स्त्री, चांडाळ, महापातकी, सूतिका, पतित, उच्छिष्ट, रजक यांचा शब्द व्रतांमध्ये श्रुत होईल तगायत्रीर १००८ जप करावा.
हे व्रत सुतकात ही करावे हे कारण जननाशौच व मृताशौच मध्येही द्वादशी व्रत (एकादशी व्रत) टाकू नये. सुतकांती मनुष्याने स्नान करून जनार्दनाची पूजा करून यथाविधी दान करावे म्हणजे व्रताचे फळ मिळते. स्त्री रजस्वला असतानाही तिने एकादशीचे दिवशी भोजन करू नये. सर्व नियम काम्य या व्रताचे ठाई अवश्य पाळावे.नित्य व्रताचे ठाई संभव असता पाळावे. शक्तिमान पुरुषाने तर विशेष करून नियम पाळावे. विशेष नियम पाळण्याविषयी जर अशक्त असेल तर त्याने अहोरात्र भोजन वर्ज्य करावे. असे जाणून एकादशी व्रत अवश्य करावे.
Comments