हनुमान जयंती : हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? हनुमानाच्या जन्मस्थळावरून वाद का?
हनुमानाचा जन्म कुठे झाला, हे जाणून घेऊ या.
हनुमान या हिंदू देवतेचा जन्म अंजनाद्री पर्वतात झाला, असा दावा तिरुमला तिरुपती देवस्थाननं 2021मध्ये केला होता.
चार सदस्यांच्या समितीने अहवाल दिल्यानंतर ही घोषणा देवस्थानने केली होती. पौराणिक आणि पुरातत्त्वीय पुराव्यांचे आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला, असं अहवालात म्हटलं होतं.
पण या दाव्याला कर्नाटकातल्या धार्मिक संस्थांनी विरोध केला. हनुमानाच जन्म कर्नाटकातल्या हंपीजवळ झाला, असा त्यांनी दावा केला.
त्यामुळे मग रामायणात उल्लेख असलेल्या हनुमानाचा जन्म नक्की कुठे झाला याबद्दल कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये वाद होत असतो.
कारण, हनुमानाचा जन्म आपल्याकडे झाला असा दावा या दोन्ही राज्यांनी केला.
डिसेंबर 2020 मध्ये तिरुपती मंदिराचं व्यवस्थापन पाहाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम् या संस्थेने एक तज्ज्ञांची समिती नेमली. या समितीनं 21 एप्रिल 2021 रोजी आपला अहवाल सादर केला होता.
आजवर असा समज होता की हनुमानाचा जन्म आमच्या नाशकात अंजनेरीत झाला.
पण आता दोन राज्य रितसर भांडतायत आणि त्यात महाराष्ट्राचा काही दावा नाही हे म्हटल्या या पौराणिक व्यक्तिरेखेचं जन्मस्थान नक्की कुठे असावं, त्याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात आणि पुराणात याचे काय दाखले आहेत ते ताडून पाहू ठरवलं.
यावर काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेली बातमी हनुमान जयंतीच्या निमित्तानं पुन्हा शेअर करत आहोत.
हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की हनुमानाने रामाला रावणाविरुद्ध झालेल्या युद्धात मदत केली होती. हनुमानाने आपल्या शेपटीने रावणाची लंका जाळल्याचेही उल्लेख पुराणात आहेत. हनुमान एकनिष्ठ रामभक्त, रामसेवक होते असंही मानलं जातं त्यामुळे हिंदुधर्मीयांमध्ये हनुमानाला देवाचं स्थान प्राप्त आहे.
हनुमानाची आणि रामाची भेट सीतेच्या अपहरणानंतर झाली. नाशिककरांचा विश्वास असा आहे की, सीतेचं अपहरण नाशिकमधून झालं. राम, लक्ष्मण, सीता नाशिकमधल्या पंचवटीत राहात होते. इथेच काळाराम मंदिर आहे, सीतागुंफा आहे, आणि जटायू-रामाची भेट झाली ते टाकेद क्षेत्रही इथेच आहे. इतकंच नाही तर लक्ष्मणाने शुर्पणखेचं नाक इथेच कापलं म्हणून या गावाला 'नासिक' असं नाव पडलं ज्यांचं पुढे 'नाशिक' झालं असाही इथे प्रवाद आहे.
हनुमानाचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला असं इथल्या लोकांना वाटतं. अंजनेरी हे नाव हनुमानाची आई अंजनीमातेच्या नावावरून पडलं. इथे डोंगरावर अंजनी मातेचं आणि हनुमानाचं मंदिरही आहे.
नाशिकच नाही, महाराष्ट्रातल्या लोकांची श्रद्धा आहे की, राम-सीता-लक्ष्मण नाशिकमधल्या पंचवटीत राहात होते, हनुमानाचा जन्म इथल्या अंजनेरी डोंगरावर झाला आहे.
असं असताना हनुमानाच्या जन्मस्थळावरून कोणत्या दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहे?
आंध्र प्रदेश - कर्नाटक वाद
हनुमानाचा जन्म आपल्याकडे झाला असा दावा दक्षिणेकडच्या दोन राज्यांनी केला.
कर्नाटकचं म्हणणं आहे की हनुमानाचा जन्म हंपीजवळच्या किष्किंधामधल्या अंजेयानाद्री/अंजनाद्री टेकड्यांमध्ये झाला आहे, तर आंध्र प्रदेशचं म्हणणं आहे की तिरुमलाच्या सात टेकड्यांमध्ये (सप्तगिरी) असलेलं अंजनाद्री हे हनुमानाचं खरं जन्मस्थान आहे.
महाराष्ट्राने या वादात उडी घेतलेली नाही, किंवा हनुमानाच्या जन्माबाबत कोणता दावाही केलेला नाही.
डिसेंबर 2020 मध्ये तिरुपती मंदिराचं व्यवस्थापन पाहाणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम् या संस्थेने एक तज्ज्ञांची समिती नेमली. यात वैदिक अभ्यासक, पुरातत्व शास्त्र अभ्यासक आणि इस्रोचे वैज्ञानिक यांचा समावेश आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानम् समितीचे कार्यकारी अधिकारी केएस जवाहर रेड्डी यांनी शंकर यांच्याशी बोलताना सांगितलं की, "तिरुमलाच्या सात टेकड्या पुराणात आणि कहाण्यांध्ये शेषाद्री, निलाद्री, गरुडाद्री, अंजनाद्री, वृषभाद्री, नारायणाद्री आणि वेंकटाद्री म्हणून ओळखल्या जातात. अंजनाद्री या टेकड्यांचा भाग आहे, ही गोष्ट अंजनेयाचा (हनुमानाचा) जन्म इथे झाला होता ही गोष्ट सिद्ध करेल. आम्ही नेमलेल्या समितीने याचा पूर्ण अभ्यास केला आहे."
रेड्डी यांच्यामते तज्ज्ञांच्या समितीकडे ऐतिहासिक पुरावेही आहेत. "अयोध्येत रामाचं मंदिर बांधलं जात असताना आता हनुमानाचं जन्मस्थळ निश्चित करणं महत्त्वाचं आहे," असंही त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
दुसरीकडे कर्नाटकचं म्हणणं आहे की, उत्तर कर्नाटकातल्या हंपीजवळ अंजेयानाद्री डोंगरावर हनुमानाचा जन्म झालेला आहे. इथे रामाची, लक्ष्मणाची आणि हनुमानाची सीतेच्या अपहरणानंतर भेट झाली होती असा उल्लेख रामायणात आहे असं कर्नाटकचे कृषीमंत्री बीसी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.
या डोंगरावर हनुमान जन्मभूमी आहे म्हणून भक्तिस्थळ उभारणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.
रामायणात किष्किंधा नगरीचे उल्लेख येतात. ही किष्किंधा नगरी म्हणजे हंपीजवळ असलेलं किष्किंधा आहे असं कर्नाटकच्या लोकांचं म्हणणं आहे.
आंध्र प्रदेशातल्या आनंदम चिंदबरा यांनी आरापल्ली इथे हनुमान अध्यात्मिका केंद्र स्थापन केलं आहे. ते एका संस्कृत शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक आहेत आणि धार्मिक प्रवचनही देतात. त्यांनी हनुमानच्या जन्मस्थळावर संशोधन प्रकाशित केलं आहे.
आनंदम चिंदबरा यांनाही हंपीजवळचं किष्किंधा म्हणजे रामायणात उल्लेख असलेला प्रदेश आहे हे मान्य आहे. वाली आणि सुग्रीव या भावंडांचं त्यावर राज्य होतं हेही ते म्हणतात. पण हनुमानाचा जन्म इथे झाला हे त्यांना मान्य नाही.
फोटो
"हनुमानाचा जन्म तिरुमला डोंगररांगेतल्या अंजनाद्री डोंगरावरच झाला. अंजनीमातेने नंतर हनुमानाला सुग्रीवाच्या सैन्यात सहभागी व्हायला पाठवलं हे खरं. ते किष्किंधेला आले होते हेही खरं, पण त्यांचा जन्म हंपीजवळ झालेला नाही," ते म्हणतात.
हनुमानाचा जन्म नक्की कुठे झाला हे समजून घ्यायचं असेल तर भविष्योत्तर पुराण, स्कंद पुराण आणि पराशर संहितेचा अभ्यास करायला हवा. रामायणात परिपूर्ण हनुमंत चरित्र नाहीये. त्यामुळे पराशर संहितेत पराशर ऋषींनी हनुमानाचं संपूर्ण चरित्र लिहिलं आहे. त्यातही सप्तगिरीमधल्या अंजनाद्रीचा उल्लेख हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून केला आहे. हंपीचा उल्लेख कोणत्याही पुराणात नाहीये, असंही मत ते व्यक्त करतात.
चिंदबंरा पुढे म्हणतात "वाल्मिकी रामायणातल्या किष्किंधा कांडात सुग्रीव अंजनाद्रीवरूनही वानरसेना बोलवून घ्या असं म्हणतात असा उल्लेख आहे. आता हंपी म्हणजेच किष्किंधा आणि तिथेच अंजनाद्री/अंजेयानाद्री असेल तर तिथून सैन्य का बोलवायचं? सैन्य तर तिथेच असेल ना, म्हणजेच हा अंजनाद्री वेगळा आहे. हा अंजनाद्री म्हणजे सप्तगिरी (तिरुमला डोंगररांगा) मधला डोंगर. याचाच अर्थ हनुमानाचा जन्म सप्तगिरी डोंगररांगांमध्ये झाला होता. पुत्रप्राप्तीसाठी अंजनादेवीने सप्तगिरीत (तिरुमला डोंगररांगा) तप केल्याचाही पुराणात उल्लेख आहे."
या दोन जागांव्यतिरिक्त आणखी तिसऱ्या एका जागेची भर या वादात पडली आहे. शिवमोगा जिल्ह्यातल्या रामचंद्रपुरा मठाचे अधिपती राघवेश्वरा भारती यांनी दावा केला आहे की हनुमानाचा जन्म कर्नाटकच्या किनारी भागात गोकर्ण इथे झाला आहे.
ते दावा करतात की, वाल्मिकी रामायणातल्या संदर्भांवरून लक्षात येतं की गोकर्ण ही हनुमानाची जन्मभूमी होती तर हंपीजवळचं अंजेयानाद्री कर्मभूमी. वाल्मिकी रामायणात हनुमान स्वतः सीतेला माझी जन्मभूमी गोकर्ण असल्याचं सांगतो असे उल्लेख आहेत, असंही राघवेश्वरा भारती म्हणतात.
अर्थातच आनंदम चिंदबरा हे दावे खोडून काढतात. "गोकर्ण हनुमानाचं जन्मस्थळ आहे ही चुकीची धारणा आहे. त्या स्वामीजींनी वाल्मिकी रामायणाचा उल्लेख केला आहे. सुंदरकांडात एक श्लोक आहे, ज्यात हनुमान सीतेला म्हणतो, 'अहं केसरिणः क्षेत्रे'. आता हनुमानाचे पिता केसरी गोकर्णचे होते, त्यामुळे त्या स्वामींनी या श्लोकाचा असा अर्थ काढला की हनुमानाने सीतेला सांगितलं मी केसरीच्या क्षेत्राचा आहे. हा अर्थ चुकीचा आहे.
इथे 'क्षेत्रज' या अर्थाने हा शब्द वापरला गेला आहे. आता 'क्षेत्रज म्हणजे काय तर महाभारतात कुंतीला पांडूच्या परवानगीने इतर देवतांपासून पुत्र प्राप्त झाले होते. म्हणजे पांडव हे पांडूचे पुत्र नाहीत तर 'क्षेत्रज'. तसंच अंजनीमातेला वायुदेवापासून हनुमानासारखा पुत्र प्राप्त झाला म्हणून ते केसरीचे 'क्षेत्रज'. मग हनुमानाचा जन्म गोकर्णला झाला असण्याचा प्रश्नच येत नाही."
मग नाशिकचा काय संबंध?
राज्य, भौगोलिक प्रदेश आणि याच्या अवतीभवती गुंफलेल्या कथा जरी वेगवेगळ्या असल्या तरी अंजनेरी, अंजनाद्री आणि अंजेयानाद्री तिन्ही ठिकाणांमध्ये समान धागा म्हणजे हनुमानाची आई अंजनीचं नाव.
रमेश पडवळ नाशिकमधले पत्रकार आणि इतिहास अभ्यासक आहेत. त्यांनी नाशिकच्या इतिहासावर पुस्तकंही लिहिली आहेत. या नावांमधल्या सारखेपणाबदद्ल ते आपल्या खास शैलीत सांगतात, "मी कुठेही गेलो तरी उमेचा मुलगा म्हणूनच ओळखला जाईन, तसंच हनुमानाचं जन्मस्थळ म्हणून जेवढ्या जागा प्रसिद्ध आहेत सगळ्या अंजनीमातेच्या नावानेच ओळखल्या जातील. खुद्द हनुमानही अंजनीपुत्र म्हणूनच ओळखले जातात."
पुराणात उल्लेखलेल्या अनेक जागा या ना त्या नावाने नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये लक्ष्मणाने सीतेसाठी आखलेली लक्ष्मणरेषाही आहे, राम-लक्ष्मण-सीता कुंडही आहेत, सीतागुंफाही आहेत आणि जटायूने प्राण सोडला ती जागा. काळाराम मंदिर आणि पंचवटीला भेट देण्यासाठी इतर राज्यातूनही भाविक इथे येत असतात.
मग नक्की काय खरं असा प्रश्न पडतो. इतिहासकार आणि व्याख्याते सच्चिदानंद शेवडे म्हणतात, "हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दल स्थानिक लोकांमध्ये कालानुरूप काही मान्यता तयार होत असतात आणि त्या मान्यता त्या लोकांसाठी खऱ्याच असतात. हनुमानाचा जन्म नक्की कुठे झाला याबदद्ल लिखित स्वरूपात कुठे काही उपलब्ध नाही. पण महाराष्ट्रातले लोक नाशिकजवळच्या अंजनेरी पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला असंच मानतात."
रमेश पडवळही या मताला दुजोरा देतात.
"अहो इंडोनेशियातही पंचवटी आहे, मग तुम्ही काय म्हणाल? भारतात नसेल अशी रामकथा तिथल्या विमानतळावर चितारली आहे. चीनमध्ये रामायणाचे उल्लेख सापडतात. हरियाणात रामायणात उल्लेख केलेल्या जागा आहेत, गुजरातमध्ये आहेत. म्हणजे ही जी रामायणाची कथा आहे, ही प्रत्येक प्रदेशाने आपआपल्या पद्धतीने स्वीकारली आहे आणि त्याला आपआपल्या पद्धतीने नावं दिली आहेत. या कथेच्या प्रत्येक आवृत्तीत त्या त्या भागातली भौगोलिक ठिकाणं आहेत," ते सविस्तर सांगतात.
नाशिकमध्येही एक किष्किंधा आहे असं त्यांनी मला सांगितलं. इतकी वर्षं नाशिकमध्ये राहूनही मीही हे नाव ऐकल्याचं मला आठवत नाही. "नाशिकमध्ये किष्किंधा नावाचं एक कुंड आहे. नाशिकमध्ये जी ठिकाणं आहेत ती सगळी तुम्हाला कर्नाटक आंध्रमध्ये पण सापडतील," रमेश म्हणतात.
त्या लोकांची या ठिकाणांमध्ये भावनिक गुंतवणूक आहे, पण त्याबद्दल ठोस पुरावे नाहीत म्हणून वाद उद्भवतात असंही ते सांगतात.
"पुराणांमध्ये एखाद्या जागेचा उल्लेख आहे, पण त्या जागेचं नक्की लोकेशन काय, अचूक भौगोलिक स्थान काय असे उल्लेख नाहीत. त्यामुळे लोकांनी आपआपल्या भागात ठरवून टाकलं आहे की ही जागा म्हणजे पुराणात उल्लेख केलेलं हे स्थळ. एखाद्याला रामायणाची कथा भावली. त्याने आपल्या भाषेत, आपल्या अभिव्यक्तीत लिहिली आणि आपल्या समोर दिसणाऱ्या भौगोलिक गौष्टींचं वर्णन केलं इतकंच."
May Lord Hanuman bless you with all the success and strength in your life. Wishes PANDITJIPUNE.
Comments